पंढरपूर – ऐरव्ही दिवाळी सणा निमित्त कागदांचे, प्लास्टिक तसेच थर्मोकोलचे आकाशकंदील सर्वजण खरेदी करीत असतात. मात्र गेल्या दोन,चार वर्षापासून चक्क वेगळा खास कौलाच्या माती पासून बनविलेले आकर्षक मातीचे कंदील तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आकारातील मातीच्या सुंदर पणत्या येथील बाजार पेठे मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. पुण्या प्रमाणेच येथील नागरिकांचा देखील या मातीचे आकर्षक आकाशकंदील आणि पणत्या खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.
गेली दोन,चार वर्षापासून दिपावली सणा निमित्त येथील दिलीप कुंभार यांनी शंभर रुपयांपासून ते एक हजार, बाराशे रुपयां पर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या तसेच प्रकाराच्या पणत्या तसेच आकर्षक मातीचे आकाशकंदील येथे विक्रीसाठी आणत आहेत. या मध्ये वेल पणती, आकाशकंदील पणती, झुंबर पणती, कमळफुल पणती, पाकळी पणती, गज किंवा हत्ती पणती, साधी पणती, मयुर पणती, वेल पणती, करंडी पणती आदी प्रकारच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्यांचा तसेच आकाशकंदीलांचा समावेश आहे. घरावरील कौले बनविण्याच्या माती पासून खास या पणत्या तसेच कंदील तयार केलेले आहेत.
खास पुण्याहून श्री.कुंभार यांनी या पणत्या येथे विक्रीसाठी आणलेल्या आहेत. या पणत्याची किंमत अगदी सत्तर रुपयांपासून साडेतीनशे, चारशे, पाचशे रुपयां पर्यंत आहेत. येथील स्टेशन रस्त्यावर श्रीराम हॉटेल शेजारी कायमच श्री. कुंभार हे मातीची भांडी विक्री करतात. मात्र दिपावली सण तोंडावर आलेला असल्याने या त्यांच्या स्टाँलवर खास सणासाठी म्हणून ते विविध प्रकारच्या तसेच विविध आकारातल्या पणत्या विक्रीसाठी ठेवतात. या आकर्षक तसेच विविध आकारातील पणत्यांना ग्राहकांकडून चांगलीच मागणी आहे. आत्ता पर्यंत बऱ्याच आकारातील पणत्यांची विक्री झाल्याचे देखील कुंभार यांनी सांगितले.
पुण्या प्रमाणेच पंढरपूरात देखील वाढली मागणी
पुण्याहून खास मागविलेल्या विविध प्रकारच्या पणत्या सणा बरोबरच ऐरव्ही घरांची शोभा वाढविण्यासाठी देखील उपयोगी पडतात. पुण्या मध्ये अनेक मोठी हॉटेल्स तसेच मोठ्या घरातून झुंबर, वेल, हत्तीपणती, कमलपणतींना मोठी मागणी असून सर्वसामान्य नागरिक देखील सणासाठी तसेच घराची शोभा वाढविण्यासाठी या पणत्या खरेदी करीत आहेत. त्यामुळे पुण्यातील या पणत्यांना तेथील नागरिकांचा जसा प्रतिसाद असतो तसाच येथील नागरिकांचा देखील कायमच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिलीप कुंभार या विक्रत्याने दिली.