जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कालच्या बैठकीत काही विषय निकाली निघाले आहेत. अधिवेशन काळात बैठक घेऊन दोन्ही समाजांवर अन्याय होणार नाही, यादृष्टीने निर्णय घेतला जाईल. तसेच या घटकात तेढ आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीने सरकार लवकरच निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जळगाव येथे शैक्षणिक संस्था चालकांच्या मेळाव्या नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी मी ‘कॉमन मॅन’ (सीएम) आहे. म्हणून प्रेमाने प्रत्येकाशी वागतो. रागवतोही तेवढ्याच हक्काने. मात्र आपला शिक्षक मतदार संघाचा उमेदवार चांगलाच कानाकोपऱ्यात पोहाचला आहे. त्यामुळे ते चांगलेच कलाकार आहेत, असे सांगत शिक्षक काहीही करु शकतो, याची जाणीव असल्याची गंमतीदार टीपण्णी मुख्यमंत्र्यांनी नोंदविली. त्यामुळे दोन तास उशीराने सुरु झालेला संवाद मेळाव्यातील ‘माहोल’ काहीसा हास्यात बुडवून गेला.
शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा जळगावात आले होते. त्यानिमित्ताने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, आमदार सुरेश भोळे, शैलेश राणे यांनी मनोगत व्यक्त केले.