मॉस्को, २४ जून (हिं.स.) : रशियामध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५ रशियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात एक धर्मगुरू आणि काही पोलिसांचाही समावेश आहे. तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दागेस्तानचे गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी आज (सोमवार) ही माहिती दिली.
गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी सांगितले की, दोन शहरांमधील दोन ऑर्थोडॉक्स चर्च, एक सभास्थान आणि पोलिस चौकीवर बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ऑर्थोडॉक्स धर्मगुरूंसह दागेस्तानमध्ये १५ हून अधिक पोलिस आणि अनेक नागरिक ठार झाले.
रशियातील रस्त्यांवर टँक आणि स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात अधिकारी, एक धर्मगुरू आणि एका चर्चच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. दागेस्तानमधील डर्बेंट आणि मखाचकला या दोन शहरांमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शोक दिवस घोषित करण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांनी फादर निकोले यांची डर्बेंट चर्चमध्ये हत्या केली आहे. फादर निकोले हे ६६ वर्षाचे होते. मागील अनेक दिवसांपासून फादर निकोले आजारी होते. मात्र दहशतवाद्यांनी त्यांचा गळा चिरुन हत्या केली, अशी माहिती दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलाएव यांनी दिली.
हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसरात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली. या हल्ल्यात एक पाद्री आणि पोलिस ठार झाल्याचे दहशतवाद विरोधी समितीने सांगितले. त्यानंतर पाच बंदूकधारी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या हल्ल्यात किती दहशतवादी सहभागी होते हे स्पष्ट झालेले नाही.
रशियाच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीने सशस्त्र अतिरेकी इतिहास असलेल्या मुस्लिम बहुल प्रदेशातील हल्ल्यांचे वर्णन दहशतवादी कृत्य म्हणून केले आहे. राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार ६ हल्लेखोर मारले गेले आहेत.
दागेस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, सशस्त्र लोकांच्या एका गटाने कॅस्पियन समुद्र किनाऱ्यावर असलेल्या डर्बेंट शहरातील सिनेगॉग आणि चर्चवर गोळीबार केला.
सरकारी माध्यमांनुसार, हल्ल्यादरम्यान चर्च आणि आराधनालय या दोन्ही ठिकाणी आग लागली. त्याच वेळी, दागेस्तानची राजधानी मखाचकला येथे चर्च आणि ट्रॅफिक पोलिस चौकीवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या.