सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने शहर हद्दीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मेजर शॉपिंग सेंटर, मिनी शॉपिंग सेंटर, भुई-भाडे (खुली जागा), अभ्यासिका-समाजमंदिर, अधिकृत खोके इत्यादी संपत्तीवरील गाळेधारक व भाडेधारकांकडील थकबाकी वसुली मोहिम सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून सकाळी ९ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून सकाळी ९ वाजल्यापासून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागामार्फत विशेष वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या विविध शॉपिंग सेंटर आणि खुल्या जागांवर अनेक गाळेधारक व भाडेधारकांकडून दीर्घकाळापासून थकबाकी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वाढ व शासकीय महसूल पुनर्प्राप्तीच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात येत आहे.
थकबाकीदार गाळेधारक व भाडेधारक यांनी आपली थकबाकी रक्कम तातडीने भरून मनपाला सहकार्य करावे. अन्यथा महानगरपालिकेकडून गाळे व जागा सील करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.उद्या पासून मेजर गाळ्यासंदर्भात कारवाई सुरु करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या महसूल विभागाने या मोहिमेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून, सर्व संबंधित अधिकारी व वसुली पथके यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. ही मोहीम सातत्याने राबवून थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा मनपा प्रशासनाचा संकल्प आहे, असेही उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले आहे.




















