सोलापूर – हिंदू नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडवा निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत एकूण १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले. या उपक्रमामध्ये मिळून शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.
गुढीपूजन झालेले प्रमुख ठिकाणे पुढीलप्रमाणे –
मल्लिकार्जुन मंदिर, दमाणी नगर येथील श्री गणेश मंदिर परिसर, श्री गणपती मंदिर (रामदेव नगर, शेळगी), विणकर वसाहत (गांधीनगर), अशोक चौक येथील व्यंकटेश मंदिर, सिद्धगणेश हनुमान मंदिर (७० फूट रोड), निलम नगर येथील भारतीय एकात्मता नवरात्र महोत्सव मंडळ, जुना घरकुल येथील श्री दत्त मंदिर (डी-२ ग्रुप), ब्रम्हनाथ नगर, वैष्णव मारुती मंदिर (जुना घरकुल), रुद्र मारुती मंदिर (एच ग्रुप, जुना घरकुल), नवीन घरकुल एस पॉइंट (ब ग्रुप), नवीन घरकुल (ए ग्रुप), पोषमा मंदिर (विनायक नगर), अक्कलकोट येथील रामगल्ली तसेच अन्य स्थानिक भाग.
या सर्व ठिकाणी ब्रह्मध्वज पूजन, प्रभू श्रीरामाची आरती, नामजप आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. अनेक ठिकाणी प्रथमच सामूहिक गुढी उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. जुना घरकुल (डी-२ ग्रुप) येथील श्री दत्त मंदिरात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करत ब्रह्मध्वज पूजन, श्रीराम आरती व हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी श्री. यश मुगड्याल, कु. शिवलीला गुब्याड तसेच स्वरांजली न्यूज चॅनलचे निवेदक श्री. गिरीश गोसकी उपस्थित होते; स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या युवतींनी पुढाकार घेतला असून उपस्थितांनी उत्साहात जयघोष करत धर्मरक्षणासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प केला. सण-उत्सव शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरे केल्यास समाजात संघभाव, प्रेमभाव आणि एकात्मता वाढते, असा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.

























