श्रीपूर – माळीनगर (ता. माळशिरस) रोटरी परिवार अकलूजच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी मॉडेल मल्टीपर्पज हायस्कूल ग्राउंड, माळीनगर येथे “रोटरी रन आणि पोलिओ जनजागृती रॅली” उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. पोलिओ निर्मूलन आणि कॅन्सर जनजागृती या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर जनप्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून “आरोग्यदायी समाज – सुरक्षित भविष्य” हा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पोलिओ निर्मूलन आणि कॅन्सरविषयी जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. रेवती राणे यांनी कॅन्सर विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देत प्रतिबंधात्मक उपाययोजना, लवकर निदानाचे महत्त्व आणि नियमित तपासणीची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसह उपस्थितांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण संदेश मिळाला.
या उपक्रमात इंटरॅक्ट क्लब ऑफ गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल, माळीनगर तसेच इंटरॅक्ट क्लब ऑफ मॉडेल मल्टीपर्पज हायस्कूल, माळीनगर यांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅली यशस्वी करण्यासाठी सक्रिय योगदान दिले.
सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल व मॉडेल मल्टीपर्पज हायस्कूल, माळीनगर येथील मुख्याध्यापक कल्लाप्पा बिराजदार व शिक्षकवृंद यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल रोटरी परिवार अकलूजने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, संचालक मनीष गायकवाड, अभिषेक टेके तसेच सदस्य आशिष गांधी, बबनराव शेंडगे, नवनाथ नागणे, गोमटेश दोशी, स्वप्निल शहा, सी.ए. नितीन कुदळे, दीपक फडे, अजित वीर सर्व शिक्षक शिक्षिका,कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल केले.



























