फुलवळ / नांदेड – कंधारेवाडी ता. कंधार येथील श्री खंडोबा यात्रेत यंदा प्रथमच कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला. या ऐतिहासिक कुस्तीच्या आखाड्याने नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील नामांकित मल्लांना एकत्र आणले, ज्यामुळे कुस्तीचे सामने चांगलेच रंगले. अ
नेक चुरशीच्या लढतीनंतर, या कुस्ती स्पर्धेतील पहिले बक्षीस नांदेड जिल्ह्यातील बामनी येथील पैलवान दिलीप किशन सांगळे यांनी पटकावले. सांगळे यांनी आपल्या दमदार खेळाने उपस्थितांची मने जिंकली. दुसरे बक्षीस कृष्णा कैलास फुलारी तर तिसरे बक्षिस दिप कागणे या पहेलवानाने जिकले. विजेत्या पैलवानाला बक्षीस वितरण गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र डिगोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच शंकर डिगोळे, माजी सरपंच केशव कंधारे, माजी उपसरपंच गुरुनाथ आमलापुरे, पोलीस निरीक्षक वाघमारे, पो.कॉ. बालाजी गारोळे, पो.पा. मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान कंधारे, राजीव कंधारे, रमेश बारोळे ,माजी चेरमण माधव जिंके यांसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या रोमांचक कुस्तीच्या डावासाठी हजेरी लावली होती. या यशस्वी आयोजनामुळे कंधारेवाडीच्या यात्रेत एक नवीन उत्साह संचारला.



















