मंगळवेढा – नगरपालिकेच्या कारभारात विकासात्मक धोरण राबविणे अत्यावश्यक असून वादाच्या राजकारणापेक्षा संवाद, अभ्यास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून काम केल्यास शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधता येईल, असे प्रतिपादन प्रा. शोभाताई काळुंगे यांनी केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त धनश्री व सीताराम परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मंगळवेढा नगरपालिकेच्या नूतन पदाधिकारांचा सत्कार समारंभात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा. काळुंगे बोलत होत्या
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ७० जणांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
प्रा. शोभाताई काळुंगे म्हणाल्या की, पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेतील प्रत्येक सभेला उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घ्यावी, त्याविषयी संस्थांकडून प्रशिक्षण घ्यावे व अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावेत. वादापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे विकासामध्ये कोणतीही बाधा येणार नाही. धनश्री परिवारातील आर्थिक संस्थांमध्येही सुरुवातीपासून प्रशिक्षण, नियोजन व पारदर्शकतेवर भर देण्यात आला असून त्याच विश्वासामुळे आज तिन्ही संस्थांमध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून लोकांचा विश्वास दृढ झाला आहे.
प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी सांगितले की, यापूर्वी रक्तदान शिबिर हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ७ मार्च रोजी आयोजित करण्यात येत होते. मात्र मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने रक्तदात्यांना त्रास होऊ नये, यासाठी गेल्या वर्षापासून हा उपक्रम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या औचित्याने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाराव्या शतकापासून मंगळवेढ्याची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संत महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, संत चोखामेळा व त्यांच्या परिवाराचे तसेच संत कान्होपात्रा यांची स्मारके उभारणे आणि कृष्ण तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर, अक्कलकोट, शेगाव व शिर्डी यांसारखी शहरे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून विकसित झाली असून, त्याच धर्तीवर मंगळवेढ्याचा विकास झाल्यास येथील बाजारपेठ वाढून आर्थिक उलाढाल वाढेल. शहरातील विकासकामांसाठी धनश्री व सिताराम परिवार कायम पाठबळ देईल, अशी ग्वाही प्रा. काळुंगे यांनी दिली. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी १० लाख रुपये तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी २ लाख रुपयांची देणगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे म्हणाल्या, रक्तदान ही अत्यंत गरजेची सामाजिक चळवळ आहे. रक्ताचा कोणताही कारखाना नसून ते मानवानेच दान करावे लागते. निवडणूक निकालाच्या दिवशीच राजकारण संपले आहे. आता स्वच्छ, सुंदर व प्रेक्षणीय मंगळवेढा शहर घडवण्यावर आमचा भर आहे. नगरपालिका सध्या क वर्गात असून तिला अ वर्गात समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत यांनी रक्तदानाला धर्म, जात-पात नसते, असे सांगत आपल्या मनोगतातून सामाजिक एकात्मतेवर भर दिला.
डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी महिलांचे सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व प्रभावीपणे पुढे येत असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. तसेच अजित जगताप, सोमनाथ माळी, विजया गुंगे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास धनश्री मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन युवराज गडदे, नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे, उपनगराध्यक्ष येताळा भगत, नगरसेवक सोमनाथ आवताडे, अजित जगताप, अरुण किल्लेदार, प्रवीण खवतोडे, सोमनाथ माळी, चंद्रकांत घुले, अनिल बोदाडे, प्रमोद सावंजी, सोमनाथ हुशारे, नगरसेविका विजया गुंगे, सीमा बुरजे, मनिषा मेटकरी, प्रीती सूर्यवंशी, तरन्नुम दारुवाले, डॉ. प्रविण सारडा, किसन सावंजी, श्रीशैल धायगोंडे, रामचंद्र बंडगर, संभाजी रोकडे, सुहास पवार, संजय चौगुले, अरुण गुंगे, तेजस सूर्यवंशी, नितीन मेटकरी, गणेश धोत्रे, बबन सरवळे, प्रभाकर कलुबर्मे, उत्तम पाटील, पूजा शिंदे, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे आणि सीताराम अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक लक्ष्मण पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कवी इंद्रजीत घुले यांनी केले.


















