सोलापूर – हिंदू धर्मातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारात यंदा दसऱ्याच्या तुलनेत पाडवा फिकाचं गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. दसऱ्या निमित्ताने ग्राहकांनी सोन्याची लयलूट केली होती. मात्र दिवाळी पाडव्याला सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे शहरातील सराफा बाजार ओस पडला होता. शहरातील मधला मारुती सराफा बाजारासह अशोक चौक, विधी घरकुल, जुळे सोलापूर, विजापूर रोडवरील विविध सराफ बाजारात हेच चित्र दिसून आले.
दरम्यान, साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याला सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांचा नेहमी ओढा दिसून येतो. परंतु यंदाच्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुराने बाधित शेतकऱ्यांच्या दुःखाला पारावारच उरला नाही. ऐन नवरात्र आणि दिवाळी सणाच्या तोंडावर असे अघटीत घडलेल्या घटनेनं दिवाळी सणाचा गोडवा हिरावून घेतला. त्यामुळे बाजारपेठेत म्हणावा तसा उठाव दिसून आला नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांनी तर दिवाळीच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती. ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खरेदीवर बराचसा व्यापार अवलंबून आहे. सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण होऊन देखील तुलनेत खरेदी तितकीशी झाली नाही. त्यामुळे नेहमी ग्राहकांनी गजबजलेली सराफ बाजारपेठ यंदा ओस पडलेली दिसून आली.
पाडव्याच्या अगोदर २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५० हजार तर चांदी प्रति किलो १ लाख ८० हजार इतकी वाढलेली होती. मात्र दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात घसरण होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख २५ हजार तर चांदी प्रति किलो १ लाख ५० हजार इतकी झाल्यानंतर देखील ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर दिवाळीच्या सणानंतर देखील सोन्याच्या दरात घसरण कायम आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर हे प्रति १० ग्रॅम
हे १ लाख १३ हजार रुपये इतके झाले होते. तर चांदीचे दर १ लाख ६० हजार रुपये इतके खाली आले होते. सोन्या- चांदीच्या दरात घसरण कायम असताना देखील खरेदी म्हणावी तितकी नसल्याने सराफ बाजारात उलाढाल साधारण झाली आहे. मात्र येणारी लग्नसराई चांगल्या पद्धतीची जाईल असे सांगण्यात येत आहे. लग्नामध्ये थोडे बहुत का होईना सोने खरेदी करावे लागते. त्यामुळे बाजारातील सर्वच सराफ पेढ्यांवर ग्राहकांची कमी जास्त प्रमाणात गर्दी दिसून येते. त्यामुळे लग्नसराई पाडव्यापेक्षा सरस जाईल,असा विश्वास सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोट
दसऱ्याच्या तुलनेत पाडव्याला सोन्याची खरेदी कमी
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसऱ्याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. दसऱ्याला सोन्याचे दर आवाक्यात होते. सध्या सोन्याचे दर १ लाख पार झाल्याने ग्राहक वर्ग सोने खरेदी करायचे की नाही या संभ्रमावस्थेत होते. सोन्याचे दर आणखीन वाढतील किंवा कमी होतील. आशा द्विधा मनस्थितीत ग्राहक अडकल्याने यंदाचा पाडवा सर्व साधारण गेला.
– गिरीष देवरमनी, अध्यक्ष सोलापूर सराफ व्यापार असोसिएशन
कोट
अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ
सोन्या-चांदीचे दर ऐन पाडव्याला कमी होऊन देखील सोन्या-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. ग्रामीण भागातील ग्राहकांवर बाजारपेठा अवलंबून आहेत. सराफ बाजारामध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांचा मोठा वाटा आहे.
नवरात्र आणि विजयादशमी याकाळात अतिवृष्टी महापूर आल्याने ग्रामीण भागात दिवाळी सण साजरा झाला नाही. त्यामुळे बाजारपेठेची उलाढाल सर्वसाधारण झालेली दिसून येत आहेत. लग्नसराई चांगली जाईल असा अंदाज आहे.
– सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष सोलापूर सराफा बाजार असोसिएशन


















