सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने मतदार यादीतील हरकती, दुबार नोंदी व मतदान केंद्रांचे काम वेगाने पूर्ण करावे. कंट्रोल चार्टमध्ये चूक चालणार नसल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार यादी, दुबार मतदारांची छाननी, मतदान केंद्र निश्चिती व कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त गिरीश पंडित, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर, अधिकारी प्रदीप निकते, संदीप भोसले तसेच सर्व उपतुकडी प्रमुख व तांत्रिक समन्वयक उपस्थित होते.
प्रारूप मतदार यादीवरील हरकती व कार्यवाहीचा आढावा दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. मतदारांकडून 3 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांची एकूण संख्या 555 असून त्या संबंधित कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीचा कंट्रोल चार्ट अचूकपणे व बिनचूक पूर्ण करणे याबाबत सतत सूचना प्राप्त होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.कंट्रोल चार्टमध्ये अपलोड नंतर दुरुस्ती शक्य नसल्याने, प्रत्येक तुकडी प्रमुखांनी पूर्ण तपासणी करूनच माहिती अंतिम करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
त्रुटी आढळल्यास उपतुकडी प्रमुख स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याची सूचना करण्यात आली.
संभाव्य दुबार मतदारांबाबत सूचना दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संभाव्य दुबार मतदारांची छाननी करण्याबाबत सविस्तर दिशा-निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांची प्रत अधिकारी व समन्वयकांना यापूर्वीच प्रदान करण्यात आले असून दि. 1 28 नोव्हेंबर 2025 च्या बैठकीतही त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाकडून सोलापूर महानगरपालिकेला प्रभागनिहाय संभाव्य दुबार मतदार यादी प्राप्त झाली असून प्रत्येक मतदाराचे स्थल सर्वेक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश आयुक्तांनी उपतुकडी प्रमुखांना दिला.
आयुक्तांनी निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे निर्धारित वेळेत, शिस्तबद्ध व त्रुटीविरहित पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मतदार यादीची अचूकता आणि मतदान केंद्रांची योग्य रचना ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने कोणतीही ढिलाई होऊ नये, असेही आयुक्त म्हणाले.
15 डिसेंबरपर्यंत प्रभागनिहाय मतदान
केंद्रांची अंतिम सूची निश्चित करणार
मतदान केंद्र निश्चिती व मतदान केंद्रनिहाय यादी
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 डिसेंबर
2025 पर्यंत प्रभागनिहाय मतदान केंद्रांची अंतिम सूची निश्चित करणे आवश्यक आहे.अंतिम मतदार यादीच्या आधारे मतदारांना मतदान केंद्रांना जोडणे व 20 डिसेंबर 2025 पर्यंत कंट्रोल चार्ट संगणक प्रणालीमध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. 27 डिसेंबर 2025 पर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रनिहाय मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश देण्यात आले.

















