अंबड / जालना – अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आज, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, अंबड येथील सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री. विजय चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणातील ठळक बाबी:
निवडणूक निर्णय अधिकारी विजय चव्हाण यांनी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली.
- निवडणूक प्रक्रिया व कायदेशीर तरतुदी: मतदानाच्या दिवशी पार पाडावयाच्या सर्व कायदेशीर बाबी, मतदानाची गोपनीयता आणि करावयची कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- ईव्हीएम (EVM) सीलिंग व हाताळणी: मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पद्धत आणि त्यावेळेस घ्यावयची दक्षता यावर मार्गदर्शन केले गेले.
- हँड्स-ऑन ट्रेनिंग (Hands-on Training): प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओज दाखवून आणि ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण (हँड्स-ऑन ट्रेनिंग) देण्यात आले.
पुढील प्रशिक्षणाचे वेळापत्रक:
निवडणूक प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित केले जात आहे. याबाबत माहिती देताना श्री. चव्हाण यांनी सांगितले की, निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी तर तिसरे आणि अंतिम प्रशिक्षण दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणांना सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
उमेदवारी मागे घेण्याची मुदत:
छाननीमध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांना आजपासून ते दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येईल. ज्यांना माघार घ्यायची आहे, त्यांनी विहित वेळेत कार्यालशी संपर्क साधावा.
आचारसंहितेबाबत कडक इशारा:
निवडणूक कर्तव्य पार पाडताना निष्पक्ष व पारदर्शीपणाने काम करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदरील प्रशिक्षण माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी असीमा मित्तल, नम्रता चाटे आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी अंबडचे निवडणूक निर्णय अधिकारी विजय चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज वक्रीडे उपस्थित होते.

















