सोलापूर : महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन येथे भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसने लेखी हरकत घेतली आहे. तीन नंतर हे पदाधिकारी आले असून त्यांनी एबी फॉर्म दाखल केले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्या निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यावी. वेळेनंतर आलेले एबी फॉर्म स्वीकारू नयेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे काँग्रेसने केली आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म दुपारी तीनच्या आत दाखल करण्यात आलेले आहे. परंतु दुपारी २:४५ भाजपचे नेते व शहर अध्यक्ष यांचा मुख्य निवडणूक कार्यालय नार्थकोट तांत्रिक प्रशाला सोलापूर येथे एबी फॉर्म घेऊन आगमन झाले परंतु एकूण ७ निवडणूक कार्यालयामध्ये एबी फॉर्म दाखल करण्यास त्यांना वेळ झाला. दुपारी ३:०५ मिनिटांनी एबी फॉर्म दाखल करत असताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे व मित्रपक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र हरकत घेण्यात आली.
दरम्यान, भाजपचे पदाधिकारी नेते हे तीन नंतर कार्यालयात आले. त्या ठिकाणी एकाही उमेदवाराचा एबी फॉर्म दिला नाही.भाजप उमेदवारांच्या अर्जासोबतचे एबी फॉर्म तीन नंतर आलेले स्वीकारले जाऊ नयेत. या मागणीचे लेखी निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने सरचिटणीस ॲड. केशव इंगळे व काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, युवक काँग्रेसचे रुपेश इंगळे यांनी सादर केले.
संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागविला : डॉ. ओम्बासे
सोलापूर महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन येथे झालेल्या घटने संदर्भात अद्याप माहिती घेतली नाही. निवडणूक अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. अर्ज स्वीकृती आणि त्यासोबतची कागदपत्रे घेणे हा अधिकार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा असतो. या संदर्भात लेखी हरकत प्राप्त झाली आहे. या संदर्भात आवश्यक ती माहिती घेऊन वस्तूस्थिती पाहिली जाईल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
ही लोकशाहीची गळचेपी : अमोल शिंदे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी भाजपचे एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आले होते पण तीन वाजून गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार बंद केले. यावेळी तेथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे उपस्थित होते. भाजपची देशात आणि राज्यात सत्ता आहे याचाच गैरफायदा हे घेत आहेत. या पंधरा दिवसात तरी दादागिरी करू नका. जर सर्वसामान्य व्यक्तीचाच अर्ज राहिला असता तर निवडणूक कार्यातील अधिकारी हे त्यांचा अर्ज घेतले असते का ? लोकशाहीची गळचेपी असून आम्ही याच्या विरोधात तीव्र लढा देणार आहोत, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मांडली.


















