सोलापूर : कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे. आपली आवड, क्षमता, कौशल्य लक्षात घेऊन कष्ट घेण्याची तयारी व सातत्यपूर्ण अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वेचे अधिकारी श्री रणवीर केसरी यांनी केले.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने केंद्रीय सेवेतील भरतीच्या संधी या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना केसरी म्हणाले पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा जग तुमच्याकडे नतमस्तक होईल, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे तरच यश प्राप्त होईल. तसेच इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषय सर्वात महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना उदाहरणासहित गणित सोडवत असताना विविध क्लुप्त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचे हे प्रात्यक्षिका सहित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ. संगमेश्वर निला यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. विजय वाघमोडे यांनी करून दिला. अध्यक्षीय भाषणात उप प्राचार्य डॉ मनोहर जोशी यांनी सांगितले की, ‘स्पर्धा परीक्षेकरिता संयम व धैर्य आवश्यक असून स्पर्धा परीक्षा ही आयुष्य घडविण्याची सुवर्णसंधी आहे. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना ध्येयाची वाट निश्चित सापडेल.’
कार्यक्रमास प्रा मनीषा चौरे, संदेश बोराळकर डॉ. पद्मावती पाटील, डॉ दिपाली पाटील उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. डॉ पद्मावती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत गजधने यांनी आभार मानले.


























