अक्कलकोट – १६ दिवसात कश्मीर ते कन्याकुमारी ४२५० किमी सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण करणारे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील प्रथम पोलीस कर्मचारी हवालदार अमृत खेडकर देवस्थान समितीला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले.
नुकतच कश्मीर ते कन्याकुमारी सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल हवालदार अमृत खेडकर यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी हवालदार अमृत खेडकर यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी हवालदार अमृत खेडकर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना महेश इंगळे यांनी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने तसेच फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी ही ४२५० किमी अंतराची भव्य सायकल रॅली दिनांक १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली.
या अत्यंत आव्हानात्मक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या रॅलीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पो.हे.कॉ.अमृत खेडकर यांनी दमदार वेग, जिद्द आणि चिकाटी दाखवत फक्त १६ दिवसांत हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. सदर स्पर्धेमध्ये देशभरातून १५० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी केवळ १०७ स्पर्धकांनी हा अत्यंत कठीण प्रवास पूर्ण केला आहे ही बाब सोलापूर ग्रामीण पोलिस दलासह मंदीर समितीसही अभिमानास्पद असल्याचे मनोगतही महेश इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी सोलापूर ग्रामीण
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, माढा पोलीस स्टेशनचे प्रभारी नेताजी बंडगर, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, गणेश इंगळे आदींसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
ही रॅली पूर्ण करणारे पहिले पोलीस कर्मचारी होण्याचा मान हवालदार अमृत खेडकर यांना प्राप्त झाला आहे, ही संपूर्ण पोलीस दलासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
हवालदार अमृत खेडकर यांचे मनपुर्वक अभिनंदन – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी
या विलक्षण कामगिरीसाठी बार्शी सायकलिंग क्लब आणि बार्शी रनिंग क्लब यांनी दिलेले मार्गदर्शन व सहकार्य देखील हवालदार अमृत खेडकर यांना मोलाचे ठरले आहे. या प्रवासातून त्यांनी उत्कृष्ट शारीरिक क्षमता, शिस्त, जिद्द आणि चिकाटीचे विलक्षण प्रदर्शन घडविले. अमृत खेडकर यांच्या या कामगिरीमुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दल तसेच संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला असून युवकांसाठी प्रेरणादायी असा हा पराक्रम ठरला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल आमच्या अनंत शुभेच्छा – अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर
फोटो ओळ – हवालदार अमृत खेडकर यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.



















