पुणे, 26 जानेवारी (हिं.स.)
गेल्या ७५ वर्षात लोकशाही ठिकूण राहण्यात संविधानाचा महत्वाचा वाटा आहे. हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण होईल अशी आशा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
पुण्यात सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे महपालिकेने कमला नेहरू रूग्णालयात आणि पिंपरीमध्ये वासीएम रुग्णालयात सर्व व्यवस्था केली आहे. या आजाराना तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली आहे, त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
यावेळी विविध २२ तुकडयाकडून झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल पुरुष व महिला, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक, लोहमार्ग , गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका १०८, बालभारती, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक, अग्निशामक दल तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी संचलन केले. शहर व ग्रामीण पोलिसांच्या बँड पथकाने विविध धून वाजवून वातावरणनिर्मिती केली. कवायतीचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.