सोलापूर – १४५ कोटी विविध धर्म व जाती असलेल्या भारतीयांना एकत्र ठेवण्यात भारतीय संविधानाचे योगदान मोलाचे आहे. भारतीय संविधानामुळे देशाचा चांगला नागरिक घडला पाहिजे तरच देशाचे रक्षण होईल.मात्र चांगला नागरिक बनून देशाचे रक्षण करणे हीच आजच्या भारतीयांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. युवराज सुरवसे यांनी केले.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए.आर.बुर्ला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्ममाने संविधान दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी ते विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक एक्कलदेवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.शंकर राजे, डॉ.ॲनी जॉन व इतिहास विभाग प्रमुख डॉ.टी.एन.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.सुरवसे म्हणाले की, २६ नोव्हेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तृत्वाचा दिवस आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय समाजव्यवस्थेचे चिंतन म्हणजे भारतीय संविधान आहे. पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतामध्ये असलेल्या धर्मातील विविधता टिकावी व समानता प्रस्थापित व्हावी व कष्टकऱ्यांच्या हिताची जोपासना व्हावी आणि भारत एकसंघ राहावा यासाठी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे शब्द समाविष्ट केले आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ.अशोक एक्कलदेवी म्हणाले की , शिक्षण व संविधान आत्मसात केले तर भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही स्वत:चा उध्दार करुन घेऊ शकतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.शंकर राजे यांनी केले. उपस्थितीतांचे आभार प्रा.उमाशंकर नादरगी यांनी मानले.सदर कार्यक्रमास प्रा.गायकवाड व विदयार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
************************
फोटो ओळ – ए.आर.बुर्ला महिला महाविद्यालयात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. युवराज सुरवसे व व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य डॉ.अशोक एक्कलदेवी, डॉ.शंकर राजे, डॉ.ॲनी जॉन व डॉ.टी.एन.शिंदे



















