सोलापूर – जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांपासून रखडलेल्या पगाराच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून, पगार मिळेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा थेट इशारा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्हा परिषद गेटसमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. याआंदोलनाचा थेट फटका जिल्हा ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयातील रुग्णसेवेला बसला आहे. विशेषतः स्वच्छता, सहाय्यक सेवा व इतर अत्यावश्यक कामांवर मोठा परिणाम झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयात सुमारे २०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे वेतन एमव्हीजी कंपनीमार्फत दिले जाते. मात्र, कंपनीकडून मागील चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात कंपनीशी संपर्क होऊ शकलेला नाही.
हे आंदोलन संघर्ष कामगार संघटनेच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “आम्ही जेवणाची वेळ टाळून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करतो. मात्र, चार महिन्यांपासून पगार नाही. कुटुंब चालवणे कठीण झाले आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
चार महिन्यांचा थकीत पगार तात्काळ अदा करावा, कामगार कायद्यानुसार मूळ पगार, प्रवास भत्ता व हक्काच्या रजा द्याव्यात, प्रत्येक कर्मचाऱ्याला पेमेंट स्लिप देण्यात यावी, रुग्णालयाकडून थेट कंत्राटी भरती करण्यात यावी, कामाच्या वेळा निश्चित कराव्यात तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक व सुलभ असावी.
















