वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून
ना.तहसीलदार कैलास जेठे यांची मध्यरात्रीला धडक कारवाई
तभा वृत्तसेवा
माहूर ,दि.०३ मार्च
: माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राजवळील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे सायफळ वाळू घाटावरून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न सुरु असून, यापूर्वी एकदा खोदलेला वाळू घाट वाळू तस्करांनी बुजवून रस्ता बनवत वाळू चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी मध्यरात्रीला सदरील ठिकाणी जाऊन पोलीस बंदोबस्तात तो वादग्रस्त सायफळ घाट पुन्हा एकदा खोदून काढत वाळू तस्करीचा रस्ता बंद केला. त्यांच्या या धडक कारवाईचा जबरदस्त धसका घेऊन वाळू तस्करांमध्ये भागमभाग माजली असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने पथक प्रमुख ना.तह. डॉ. राजकुमार राठोड,ना.तह. कैलास जेठे यांनी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रावर असलेले अधिकृत, अनधिकृत सर्वच वाळू घाटावरील रस्त्यावर जेसीबीद्वारे मोठे खंदक खोदणे सुरू केले असून, वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करीत असताना पडसा येथे कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी धमकी दिली तर कालच अनमाळ ते हडसणी रस्त्यावर वाळू तस्करांनी महसूल पथकाला ०६ किलोमीटर पळवत गुंगारा देऊन ट्रॅक्टर घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्यानंतर यावर खबरदारी म्हणून ‘ना रहेगा बास ना बजेगी बांसूरी’ या उक्तीप्रमाणे वाळू चोरीसाठी रस्ताच राहू नये या उद्देशाने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी दि.०२ व ०३ च्या मध्यरात्री सायफळ घाटावर खंदक खोदण्याची धडक कारवाई केली.
सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना, कावली तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करीविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याने वाळू तस्करी जवळपास बंद झाली आहे. महसूल विभागाने वाळू तस्कर विरोधात धडक कारवाया सुरू ठेवल्याने वाळू तस्करांनी ना.तह. कैलास जेठे यांनी खोदलेले वाळू घाट बुजवून पुन्हा त्याठिकाणी रस्ता बनवत वाळू चोरी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सायफळ घाट गाठून मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात सदरील घाट २० ते २५ मीटर लांब आणि १५ ते २० फूट खोल खोदून काढल्याने वाळू तस्करांची तगमग वाढून चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे परिसरात पसरलेल्या सन्नाटा वातावरणावरुन दिसून येत आहे.
याउपरही वाळू तस्करीत एखाद्या ट्रॅक्टर टिप्पर चालकाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास त्यांचें घरूनही ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल ! असा कडक इशारा तहसीलदार किशोर यादव, ना.त. डॉ. राजकुमार राठोड व ना.त.कैलास जेठे यांनी दिला आहे. या कारवाईवेळी पोलीस पाटील हेमंत गावंडे पाटील,
सपोउपनी संजीवन त्र्यंबकराव सानप, होमगार्ड पुरुषोत्तम नेवारे, होमगार्ड वसीम पठाण सोबत होते.