पंढरपूर – सहकार शिरोमणी साखर कारखाना चालु नये, तो बंद पाडण्यासाठी विरोधकांनी अपप्रचार, बदनामी, असे अनेक अडथळे आणले. शासकीय कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे कारखान्यास वेळेत निधी उपलब्ध झाला नाही. मात्र विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता सर्व सभासदांचे, कामगारांचे व या संस्थेवर उपजिविक करणाऱ्या कुटुंबियांचे हित डोळ्यासमोर ठेवुन आर्थिक अडचणीतून मार्ग काढत ही संस्था मार्गक्रमण करीत असल्याचे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखान्याची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.३१) चेअरमन कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न् झाली. या सभेत मार्गदर्शन करताना श्री.काळे बोलत होते.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, यांच्यासह सर्व आजीमाजी संचालक, कारखान्याच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————
चेअरमन काळे यांनी केले १२ मुद्यांचे निरसन –
यावेळी उपस्थित सभासदांनी उपस्थित केलेल्या १२ मुद्याचे पुराव्यासह निरसन चेअरमन कल्याणराव काळे यांनी करुन उपलब्ध निधीचा ऊस बिल, तोडणी वाहतुक बिल, कामगार पगार इ. साठी केल्याचे सांगतले.
———————
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कारखाना होणार सुरु –
सन २०२५-२६ गळीत हंगामामध्ये सुमारे सहा लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट् असून, नोव्हेंबरचे दुसऱ्या आठवड्यात कारखाना सुरु करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज् ठेवण्यात आली असून, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन चेअरमन काळे यांनी केले.
————————
एकमताने सर्व ठराव मंजुर –
वार्षिक सभेतील विषय पत्रिकेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदांकडून हात उंचावुन एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी सभासदांचे सुचनेनुसार एैनवेळी आलेल्या विषयावरही सर्व सभासदांनी आवाजी एकमताने मंजुरी दिली. विषयाचे वाचन प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले. कारखान्याचे संचालक युवराज दगडे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला.
———————–
संस्थेस आर्थिक नुकसान पोहचविणाऱ्यांचे सभासदत्व रद्द –
एैनवेळी कारखान्याचे सभासद रणजीत जाधव यांच्यासह इतर सभासदांनी संस्थेच्या हितास बाधा आणणाऱ्या, संस्थेस आर्थिक नुकसान पोहचविणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली. त्यास उपस्थित सर्व सभासदांनी आवाजी एकमताने मंजुरी दिली.
















