सोलापूर: : श्रद्धेय भाऊसाहेब गांधी यांच्या ‘जन्मशताब्दी वर्ष’ – प्रारंभानिमित्त आयोजित, ‘वृक्षारोपण’ व सामुदायिक ‘स्वच्छता’ अभियाना मध्ये, सोलापूरकरांच्या तसेच,वालचंद शिक्षण समूहातील माध्यमिक, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, तसेच विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यश मिळाले.
कडाक्याच्या थंडीची सकाळ असूनही,वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) प्रांगणात सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर, सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. “संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार प्रमुख अतिथी म्हणून,उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी भूषविले. वालचंद शिक्षण समूहाचे ‘विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, पराग शहा, वैभव गांधी तसेच भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जमगे, ‘भारतीय जैन संघटना’ राज्यअध्यक्ष केतन शहा आणि शहरातील विविध जैन मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, “वृक्षारोपण आणि स्वच्छता या केवळ पर्यावरणीय जबाबदाऱ्या नाहीत, तर त्या आपल्या संस्कार, सेवा आणि शिक्षण या मूल्यांना मजबूत करणाऱ्या आहेत. आज सोलापूरकरांनी दिलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद हा भाऊसाहेब गांधी यांच्या कार्याला आणि विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे. शिस्त, वेळेचे अचूक नियोजन आणि समर्पित सेवाभाव या गुणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली, अशा शब्दांत डॉ. ओम्बासे यांनी अभियानाचे कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गांधी म्हणाले, जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबवलेल्या या प्रारंभिक उपक्रमाने पुढील कैक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून, “संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण”- श्रद्धेय भाऊसाहेबांच्या विचाराचा प्रभावी विचार सोलापूरकरांनी पुन्हा एकदा जगासमोर ठेवला.


















