सोलापूर – घर, जागा, जमीन ही संपत्ती नसून सुसंस्कृत मुले हीच कुटूंबाची खरी संपत्ती आहे. ग्रामीण भागात राहून आरती जाधव, ऋतुजा राठोड व गोविंद शिंदे यांनी मिळवलेले यश हे देशात कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केले.
राज्यसेवा परीक्षेत हिपळे येथील आरती जाधव ही राज्यात मुलीमध्ये पहिली आली तर भोजप्पा तांडा कवठे येथील ऋतुजा राठोड व्हिजीएनटीमध्ये राज्यात पहिली आली. तसेच हगलूर येथील गोविंद शिंदे हे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण झालेबद्दल ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माने बोलत होते.
ग्रामीण भागात सुविधा नसताना देखील आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मनात जिद्द व ध्येय घेऊन मिळवलेले यश हे सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे माने यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सुनील जाधव, सरपंच उमेश भगत, साहेबराव शिंदे, चाचा चव्हाण, विशाल भोसले, कुमार जगताप, युवराज जाधव, कमलाकर भोसले, सुनील मेठे, वैशाली पवार, महेंद्र खटके, संजय जाधव, सचिन व्हनमाने, आकाश जाधव आदीसह कुटुंबीय, कार्यकर्ते उपस्थित होते.

















