तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणातून मंगळवारी दुपारी पाचच्या सुमारास भीमा नदी मध्ये २५ हजार क्युसेस्क एवढा विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती भीमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता स.शि.मुन्नोळी यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणात येणाऱ्या पावसाच्या पाण्याला सामावुन घेण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.
उजनी धरणातून मंगळवारी दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेस्क इतका विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्या मध्ये वाढ करुन तो विसर्ग दहा हजार क्युसेक्स इतका करण्यात आला. दरम्यान मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हा विसर्ग वाढवून तो १५ हजार क्युसेक्स इतका झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या मध्ये तब्बल दहा हजार क्युसेक्सची वाढ होवून उजनी धरणातून विसर्ग २५ हजार क्युसेक्स इतका करण्यात आला असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता स.शि.मुन्नोळी यांनी दिली. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.