माहूर / नांदेड – जगाच्या इतिहासात तब्बल दोनशे वर्षानंतर पहिल्यांदाच काशीमध्ये अत्यंत कठीण, प्राचीन आणि अनुशासित असे ‘दंडक्रम’ वेदमंत्र पठण पूर्ण करत आपल्या अतुलनीय वेदानुष्ठानामुळे ‘दंडक्रम विक्रमादित्य’ मानाची पदवी प्राप्त करणारे महाराष्ट्राच्या अहिल्यानगर येथील श्रृतिस्मृती ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे अवघ्या १९ वर्षाचे छात्र वेदमूर्ती चि. देवव्रत महेशजी रेखे गुरुजी यांनी शनिवारी दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी रेणुकादेवी महासंस्थान माहूरगड येथील कुलस्वामिनी श्री रेणुकादेवीचे दर्शन व आपले काशी वाराणसी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक अद्वितीय असे ‘दंडक्रम पारायण’ श्री रेणुका चरणी समर्पित करण्यासाठी मातेच्या दरबारात हजेरी लावली.
यावेळी दंडक्रम विक्रमादित्य चि. देवव्रत रेखे यांचे वडील व गुरू तथा भारतातील एक सुप्रसिद्ध विद्वान, शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे पूज्य महेशजी चंद्रकांत रेखे गुरुजी हे आपला शिष्य व पुत्र देवव्रत आणि कन्या मैथिली महेश रेखेसह भगवती श्री रेणुका माता चरणी लीन झाले. यावेळी त्यांच्या सोबत अंबादास श्रीकृष्ण जोशी वेदाध्ययन ज्ञानपीठ माहूरगड येथील प्रधानाचार्य,दंडक्रम वेदपारायण संयोजक व निवेदक निलेश केदार गुरुजी, दंडक्रम वेदपारायणाचे मुख्य परीक्षक व ब्रह्मचैतन्य गुरुकुलम्चे प्रधानाचार्य वेदमूर्ती देवेंद्र रामचंद्र गढीकर गुरुजी जळगाव तथा अमरावती, संस्कार भारती प्रमुख सौ.शितल निलेश केदार,उज्वला केदार व राधा केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी रेणुकादेवी महासंस्थान माहूरगडचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,आशीष जोशी, अरविंद देव, बालाजी जगत व अर्चक मंडळाचे सर्व सदस्य यांनी पूज्य महेशजी रेखे गुरुजी व दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे गुरुजी यांसह मान्यवरांचा यथोचित सत्कार करून मानाचे महावस्त्र प्रदान केले.
वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदातील
माध्यंदिन शाखेतील सुमारे २००० मंत्रांचे दंडक्रम पारायण ५० दिवसांच्या कठोर साधनेत पूर्ण केले, ज्यासाठी त्यांना ‘दंडक्रम विक्रमादित्य’ ही पदवी मिळाली आहे.अशी कामगिरी दोन शतकांनंतर घडली आहे.
जगाच्या पाठीवर आणि इतिहासात फक्त दुसऱ्यांदा तर तब्बल दोनशे वर्षानंतर पहिल्यांदाच ‘दण्डक्रम पारायण’ तेही महाराष्ट्राच्या अहिल्यानगर येथील अवघ्या १९ वर्षांचे असलेले वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे या तेजस्वी युवकाने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेतील ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण करून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा अद्वितीय पराक्रम साध्य केला आहे.
५० दिवस श्रीक्षेत्र काशी येथे, तब्बल १६५ तासांपेक्षा अधिक वेळ, तेही ‘एकाकी’, ग्रंथ न पाहता केलेले हे पारायण अनेक वेदज्ञ, विद्वान आणि महापुरुषांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे.
वेदांच्या मौखिक परंपरेतील आठ विकृतींपैकी ‘दण्डक्रम’ ही सर्वोच्च कठीण, अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण पद्धत मानली जाते. असे पारायण जगाच्या इतिहासात आजवर फक्त दोन वेळा घडले आहे आणि त्यातील दुसरे पारायण महाराष्ट्राच्या या सुपुत्राने, तेही अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केले.
‘दण्डक्रम पारायण’ हे अचूकता, लय आणि कठोर अनुशासनाची सर्वोच्च मागणी करणारे, विरळा येणारे आणि अत्यंत कठीण पठण मानले जाते. जवळपास दोन शतकांनंतर केवळ दोन वेळा नोंदले गेलेल्या या पराक्रमाला देवव्रतजींनी यशस्वीरीत्या पूर्ण करून जिवंत वेदपरंपरेचे सामर्थ्य, श्रद्धा आणि गुरु-कृपेची महत्ती उजळून दाखवली आहे.
ह्या दंडक्रम वेदपारायण कार्यक्रमाची दखल केंद्र सरकारसह विविध राज्यातील सरकारने घेतली असून
या अद्वितीय, अलौकिक साधनेसाठी चि.देवव्रत गुरुजींना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा जिथे हे दंडक्रम पारायण साध्य झाले अशा (काशी) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे गुरुजी यांचे विशेष मनस्वी कौतुक करत अभिनंदन केले आहे. तर अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
शनिवारी सायंकाळी माहूरगडावर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी ते आले असता विश्वस्त, पूजारी,व अनेक मान्यवरांकडून त्यांचा सत्कार व अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दंडक्रम विक्रमादित्य पदवी प्राप्त विश्वातील सर्वात मेधावी, बुद्धिमान छात्र म्हणून गणना झालेले व प्रसिद्ध वैदिक घनपाठी महेशजी रेखे गुरुजी यांचे शिष्य चि.देवव्रत महेश रेखे यांनी करण्यात येत असलेल्या या सत्कार, अभिनंदन व शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


























