तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : विधान भवनात रमी वरून झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा बदल करत कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली. पूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता भरणे मामा यांचाकडे कारभार सोपवण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग होता. आता तो माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आला. कोकाटे यांच्यावर विधान भवनात रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर या मोठा बदल करण्यात आला आहे.
कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतच दत्तात्रय भरणे भावनिक होत म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीखातं मिळणं, याहून मोठा आनंद काय असू शकतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग देखील करणार असल्याचे ते म्हणाले.