सोलापूर – शहरातील प्रभाग क्र. १५ मधील कोणापुरे चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या कथित निकृष्ट रस्ता दुरुस्तीच्या निषेधार्थ निलेश श्रीनिवास संगेपाग यांचे अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान या परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना संपूर्ण रुंदीमध्ये “लाईक टू लाईक” पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. त्याऐवजी अत्यल्प जाडीचे, अंदाजे अर्धा ते एक इंच काँक्रीट टाकण्यात आल्याने रस्त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणी संगेपाग यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदने देत संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच दर्जेदार आणि नियमांनुसार डांबरीकरण करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीपासून शांततामय अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी पाठिंबा दर्शविला आहे. “हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. श्रीकांत वाघमारे, जुबेर हिरापुरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, आकाश गायकवाड, सुचित्रा वाघमारे यांच्यासह अनेक नागरिक आंदोलनस्थळी उपस्थित राहत आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संगेपाग यांनी दिला आहे.























