सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील माशांच्या मृत्यू प्रकरणी महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत इंद्रभुवन इमारतीच्या पायरीवर मृत मासे टाकून प्रहार संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
श्री सिद्धेश्वर तलाव येथील शेकडो मासे ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला तसेच कासवांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे या घटनेकडे लक्ष वेधत प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर महापालिकेत इंद्रभुवन इमारतीच्या पायरीवर मृत मासे टाकून निषेध नोंदविण्यात आला. निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. पायरीवरच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी “महापालिका प्रशासन हाय हाय”, “माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण?” अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी म्हणाले की, तलावातील पाण्याची नियमित तपासणी व ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी महापालिका, पीडब्ल्यूडी आणि वन विभागाची आहे मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला. याला थेट महापालिका जबाबदार आहे. श्री सिद्धेश्वर तलावातील पाणी प्रदूषित होते तर इतके दिवस प्रशासन काय करत होते ? दूषित पाण्यामुळे मासे आणि कासव यांचा मृत्यू झाला. या तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतील कामांचे काय झाले असा सवाल उपस्थित करत मासे मृत्यू प्रकरणी महापालिका, पीडब्ल्यूडी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तलावातील पाणी शुद्धीकरणाची तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी अजित कुलकर्णी यांनी केली.
याप्रसंगी प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

























