सोलापूर : शहरातील खड्ड्यांमुळे तसेच उघड्या मॅनहोलमुळे लोकांचे मृत्यू होतात. यासंदर्भात नुकसानभरपाई देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेत समिती गठित करण्यात आली आहे.
सोलापुरात खड्ड्यांमुळे तसेच उघड्या मॅनहोलमुळे आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या बेपर्वाईमुळे अशा घटना घडतात असा नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप असतो. अशा घटना घडल्यास मृत पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईक, कुटुंबीय यांना महापालिकेकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा असते. पण प्रशासनाकडून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात टाळाटाळ वा
दिरंगाई होत असते. म्हणूनच संबंधित लोक यासंदर्भात न्यायालयात जातात.
मुंबई उच्च न्यायालय यासंदर्भात एक लोकहित याचिका दाखल आहे. या याचिकेची सुनावणी दि. 13 ऑक्टोबर रोजी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किंवा उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या मृत्यूबाबत मृतांच्या कायदेशीर वारसांना तसेच दुखापत झाल्यास दुखापतीचे स्वरुप आणि गंभीरता इत्यादी विचारात घेऊन नुकसान भरपाई देणेबाबत आदेश पारित केले आहेत. याशिवाय इतर विविध निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश सोलापूर महापालिकेला दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने समिती गठीत केली आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्त हे समितीचे अध्यक्ष व सदस्य आहेत. सदस्य म्हणून सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर सदस्य यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
 
	    	 
                                




















 
                