सोलापूर येथील मीरा हॉस्पिटल या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल तरुण रुग्णाचा शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याने मृत्यू झाला. प्रवीण अमृत करंडे (वय २७, रा. होमनगर, भवानीपेठ, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. तर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तर हॉस्पिटलचे डॉ. हर्षल थडसरे यांनी नातेवाइकांचा आरोप फेटाळून लावत शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर येईल, असे स्पष्ट केले. शवविच्छेदन अहवालानुसार पुढील कार्यवाही करू, असे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रवीणला दारुचे व्यसन होते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी नवीन आरटीओ कार्यालय व रामवाडी रस्त्यावरील यतीमखान्यानजीकच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दम लागल्याने शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी होऊन रक्तदाबही कमी झाला. त्याला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.