सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पती-पत्नीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर एकाच चितेवर अग्नी देण्यात आले. हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून अनेकांना शोक अनावर झाला.
किसन रामा हेगडे (वय ७०) यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होता. मात्र त्यांचा भाऊ बाहेरगावी असल्याने ते येण्याची वाट पाहत होते. तर दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारीही सुरू होती. परंतु रात्री ८.४५ वाजता पत्नी भामाबाई किसन हेगडे (वय ६०) यांचे निधन झाले.

एकाच वेळी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. गावावर शोककळा पसरली. शनिवारी सकाळी त्या दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.



















