राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. आरोपीला वांद्रे महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांबद्दल युट्यूब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. सोबतच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. अक्षय यांच्या तक्रारीनंतर आधी नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडिओतील मुख्य आरोपी किंचक नवलेचा शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं तपासात समोर आलं. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बझार येथून अटक केली आहे. हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयात हजर केले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जीवे ठार मारण्याची धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आणि तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करत व्हायरल केला, या कटात आणखी कोण सामील आहे, याबाबतच्या चौकशीसाठी १० दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असं म्हणणं पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलं. न्यायाधीशांनी नवलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
दरम्यान या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेला योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्यालाही ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.