अर्धापूर : तालुक्यात सलग तीन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने नदी – नाल्यांना प्रचंड पूर येवून पुराचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत द्यावी. तसेच संपूर्ण अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी दि. ४ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार अर्धापूर यांच्या मार्फत व्हॉईस ऑफ मीडिया अर्धापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली.
अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, मालेगांव आणि दाभड या तीन महसूल मंडळात शनिवार, रविवार, सोमवार या तीन दिवसात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तुर, मुग आदी पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रशासनाकडून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना अर्थिक मदत द्यावी. तसेच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळीचे नियम तात्काळ लागू करा. अशा मागणीचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार अर्धापूर यांच्या मार्फत व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनावर पत्रकार संघटनेचे राज्य संघटक नागोराव भांगे पाटील, ज्येष्ठ पत्रकार रामराव भालेराव, तालुकाध्यक्ष गोविंद टेकाळे, कार्याध्यक्ष डिगांबर मोळके, उपाध्यक्ष छगनराव इंगळे, शेख साबेर, सचिव इरफान पठाण, अनिल मोळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.