काय ताई, बोल ताई, रडू नको ताई असा फोन वरील संवाद अन सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, आर आर पाटील, विलासराव देशमुख,निळू फुले यांच्या आवाजातून हास्यसम्राट दिपक देशपांडे यांनी जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला. त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देवून हास्याचे फवारे उडवले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम गुरूवार सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारागृह अधिक्षक एच एस मिंड, उपअधिक्षक एस एल आढे, वरिष्ठ तुरुंगअधिकारी बी डी आगावणे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रकाश मोकाशे, विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे त्यांच्यावरील तणावातून मुक्तता मिळावी या हेतुने जिल्हा कारागृह प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा कारागृह अधिक्षक एच एस मिंड यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यानंतर हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. नंतर प्रा.दिपक देशपांडे यांनी आपल्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाला सुरूवात केली. सोलापूरकर बोलताना कसा बोलतो आणि बोली भाषेतून सोलापूरकर कसा ओळखावा याचे सादरीकरण केले. आकाशवाणीवरील कामगारांची मुलाखत, आपकी पसंद कार्यक्रमामध्ये सहभागी फोन कॉल्सची रंजकता, जुन्या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यासह अनेक मान्यवरांचे आवाज काढून उपस्थित बंदीजनांचे मनोरंजन केले. त्याला बंदीजनांकडून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडवून प्रतिसाद देण्यात आला. प्रारंभी कारागृहातील कामकाज आणि सुविधा, व्यवस्थाबाबत माहिती देण्यात आली.