मुदखेड ता प्र
नगर परिषदेच्या विकास कामांमध्ये होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर आक्रमक भूमिका घेत, 9 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्थापत्य विषयक ऑनलाईन निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्याची मागणी आता थेट नव्याने नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कैलास गोडसे यांनी एका लिखित निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती परंतु या प्रकरणी अद्याप पर्यंत कोणतीही उचित कार्यवाही न झाल्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी थेट खा . वसंतराव चव्हाण यांच्या लेटर पॅडवर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या विकास कामांमध्ये होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार, विकास कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी योग्य निविदा प्रक्रियेचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास, जनहितार्थ न्यायालयात जाण्याचा इशाराही काँग्रेसने दिला असून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक कैलास गोडसे ,माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण ,युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अविनाश चौदंते,मोहम्मद इकबाल कुरेशी, यांची उपस्थिती होती.