सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी निरीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकात शिंदे यांच्याकडे केल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. माने यांनी अचानकच तडकाफडकी निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना दिलेल्या पत्रात माने यांनी म्हटले आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील संघटनेची कामे करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे. माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी या काळात पक्षाला दोन्ही निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात मला दिलेल्या जबाबदार्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. पक्षाला यश मिळाले, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे, असेही माने यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
शेखर माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.माने यांच्या या निर्णयामुळे आता सोलापूर जिल्हा निरीक्षकपद कोणाकडे सोपवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















