सोलापूर : प्रतीक्षा यादीतून शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, न्यायालयीन प्रकरणातील शिक्षकांना पदस्थापना द्यावी यासह इतर जिल्हा परिषद स्तरावर रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
समायोजनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी, विषय शिक्षक मंजूर करावेत, मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यापूर्वी केलेल्या समुपदेशनाचे आदेश द्यावेत, शैक्षणिक अडचणी असलेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करावी, अर्धवेळ शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी आदेश काढावेत, या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर, अन्वर मकानदार, बाबासाहेब माने, चरण शेळके आदी उपस्थित होते.


















