पंढरपूर – सध्या वाढत्या उन्हामुळे भीमा नदीपात्रातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून उपलब्ध पाणी केवळ पुढील ७ ते ८ दिवस पुरेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून शेतीसाठीही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, उजनी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन उजनी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, सचिन आटकळे, नानासाहेब चव्हाण, समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.
























