पंढरपूर – येथील वैकुंठ स्मशानभूमीतील ५० लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेली गँस दाहिनी गेल्या दोन,चार वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांच्या पार्थिवावर या गँसदाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असताना देखील मृतांच्या नातेवाईक मंडळींना येथील स्मशानभूमीमध्ये सध्या पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत सुरु करावी अशी मागणी शहर व उपनगरातील नागरिकांमधुन केली जात आहे.
येथील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेहावर लाकडाचा वापर करुन अंत्यसंस्कार करण्यात येत होते. लाकडाच्या वाढलेल्या किंमती आणि लाकूड वापरामुळे प्रचंड प्रमाणात होत असलेले प्रदूषण तसेच दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन यामुळेच इंधनासाठी लाकडा ऐवजी सोलार किंवा गँसचा वापर करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे.
दरम्यान पंढरपूरातील वैकुंठ स्मशानभूमीत राज्यसभेचे तत्कालीन खासदार राजकुमार धुत यांच्या खासदार निधीतून पन्नास लाख रुपये आणि येथील नगरपालिकेने काही निधी खर्चुन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गँस दाहिनी उभी केली होती.
गँस दाहिनी उभी करण्यात आल्यावर देखील येथील स्मशानभूमीत पारंपारिक पध्दतीने आणि गँस दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पालिकेकडून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. सुरुवातीला काही दिवस मृतांच्या अनेक इच्छुक नातेवाईकांकडून या गँस दाहिनीमध्ये आपल्या आप्तस्वकीयाच्या मृतदेहांवर अंत्यंस्कार करण्यात आले होते. तर ज्यांना गँसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणे पटत नव्हते ते पारंपारिक पध्दतीने आपल्या नातेवाईकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत होते.
मात्र गँस दाहिनी सुरु झाल्यावर काही महिन्यांमध्येच कोरोनाच्या एक, दोन लाटा आलेल्या होत्या. त्या काळात कोरोना आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या इतरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेवून अंत्यसंस्कार करण्याच्या प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा देखील लावण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी सुरुवातीला तर कुटुंबातील एक, दोघां सदस्यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांकडूनच कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते.
येथील स्मशानभूमीत देखील खबरदारी घेऊन कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर सुरुवातीला काही दिवस गॅस दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी येथील नगरपरिषदेकडून एक हजार रुपये एवढा माफक दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींच्या काळात अंत्यविधीसाठीचा येणारा खर्च देखील कमी झाला. पर्यायाने होणारे प्रदूषणही देखील रोखले गेले.
या बरोबरच अंत्यसंस्कार करताना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील कमी झाला होता ही एकीकडे वस्तुस्थिती होती.
तर दुसरीकडे मात्र कोरोनामुळे झालेले मृतदेह जाळल्यामुळे याचा परिणाम विपरीत झाला. कारण कोरोनामुळे मृत झालेले मृतदेह हे प्लास्टिक बँग मध्ये ठेवलेले असायचे. त्यामुळे अशा पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना तो गँस दाहिनी मध्ये तसाच ठेवला जायचा. अशा प्रकारे कोरोनामुळे मृत झालेल्या अनेकांच्या पार्थिवावर त्यावेळी या गँसदाहिनी मध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे गँस दाहिनीच्या चिमणी मध्ये काजळी चढत गेली. परिणामी पर्यावरण पूरक असणारी ही गँस दाहिनी बंद पडली.
दरम्यान पालिकेकडून पुन्हा या गँस दाहिनीच्या दूरुस्तीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन,चार वर्षापासून शहर तसेच उपनगरातील नागरिकांना आपल्या नातेवाईकाच्या मृतदेहावर गँस दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असून देखील गँस दाहिनी बंद असल्यामुळे त्यांना पारंपारिक पध्दतीनेच लाकडे जाळून अंत्यसंस्कार करावे लागत आहे.
पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी खर्च देखील मोठा येतो आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे यासाठी वृक्षतोड देखील करावी लागत आहे. पावसाळ्या मध्ये लाकडे ओली असल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कमालीचा त्रास होत असतो. त्यामुळे पालिकेने या सर्व बाबींचा विचार करुन लवकरात लवकर गँस दाहिनीच्या दूरुस्तीचे काम हाती घ्यावे.
येत्या काळात ती दूरुस्त करावी आणि नागरिकांना गँस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शहर तसेच उपनगरातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
—————————
गँस दाहिनी दुरुस्त झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे सोपे होईल. या बरोबरच होणारे प्रदूषण टाळले जाईल,पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील थांबला जाईल. त्यामुळे पालिकेने त्वरीत बंद पडलेली गँस दाहिनी सुरु करावी अशी आमची विनंती आहे.
अजय जाधव (शहरातील एक सुज्ञ नागरिक)
————————–
फोटोओळी : पंढरपूर : येथील वैकुंठ स्मशानभूमीतील गँस दाहिनी सध्या बंद असल्यामुळे मृतदेहांवर पारंपारिक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
























