जालना – बदनापूर येथील हिंदू स्मशानभूमीच्या आवारात बराच काळापासून नगरपंचायतीच्या घंटागाड्या, ॲम्ब्युलन्स, ट्रॅक्टर तसेच इतर उपकरणे उभी असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. तसेच स्मशानभूमीच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना सोमवार ता. ०३ रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्मशानभूमीतील सर्व वाहने आणि उपकरणे तात्काळ हटविण्यात यावीत, तसेच परिसरातील कचरा त्वरित उचलून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पुढील काळात अशा प्रकारचा कचरा स्मशानभूमी परिसरात टाकला जाणार नाही, याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्मशानभूमी परिसर स्वच्छ, शांत व धार्मिक वातावरणात राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




















