अहिल्यानगर : निवडणूक व मतदान प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे. जागरुक मतदारांमुळेच लोकशाही भक्कम असल्याचे प्रतिपादन महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चे स्वीप नोडल ऑफिसर अशोक साबळे यांनी केले. रेल्वे स्टेशन – मल्हार चौक परिसरातील संजीवनी कॉलनीतील सर्व रहिवाशांनी १०० टक्के मतदानाचा संकल्प केला असून तसे संकल्प पत्र कॉलनीचे अध्यक्ष श्रीकृष्ण लांडगे व सचिव अभय ललवाणी यांनी स्वीप नोडल ऑफिसर श्री साबळे यांच्याकडे सूपूर्द केले, त्यावेळी ते बोलत होते.
साबळे पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये सक्रिय सहभाग म्हणून संजीवनी कॉलनीतील मतदारांनी केलेला हा 100% मतदानाचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे यावेळी श्री साबळे यांनी सांगितले.
येत्या १५ तारखेला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी श्री साबळे यांनी केले. यावेळी प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, सहा. स्वच्छता निरीक्षक भरत सारवान उपस्थित होते. १०० टक्के मतदान उपक्रमामध्ये संजीवनी कॉलनीतील अशोक चुडीवाल, सुरेश चांडक, सुनील जोशी, चंद्रकांत शिपणकर, महावीर ललवाणी, सागर दुर्गुळे आदी सदस्यांनी सहभाग घेतला आहे.

















