करकंब प्रतिनिधी:- वैद्यकीय व्यवसायात कार्यरत डॉक्टरांपासून ते परिचारकांपर्यंतचे सर्वच कर्मचारी म्हणजे पृथ्वीवरील देवदूतच.परंतु सध्या इतरांना जीवदान देणाऱ्या वैद्यकीय पेशातील मंडळींच्या जीवावरच काही राक्षस उठलेले दिसतात.विशेषत्वाने या क्षेत्रातील महिलांची अब्रू धोक्यात आल्याचे कोलकात्याच्या बलात्कारानंतर पुनशः अधोरेखित झाले.कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांचे मोठे आंदोलन देखील झाले होते.या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने शनिवार दि.१७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
या बंदमध्ये करकंब येथील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. आयएमएकडून रुग्णालयांना सेफ झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.या देशव्यापी आंदोलनाचा देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम दिसुन येणार आहे.सर्व दवाखाने,क्लिनिक्स,ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्ट सकाळी ६ ते १८ ऑगस्ट सकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार येणार आहेत.मात्र आत्यावशक सेवा, आयसीयु,अपघात विभाग,प्रसूती विभागही सुरू राहणार असल्याचे करकंब डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांतकुमार मोरे व आयएमएने स्पष्ट केले आहे.तब्बल २४ तास इतर सेवा बंद राहणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार असून कोलकात्यातील घटनेनंतर अश्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता बंदचे पाऊल उचलण्यात आले आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी पंढरपूर आयएमए संघटेनेचे अध्यक्ष डॉ.शितल शहा,डॉ.संजय देशमुख,डॉ.रवी आहेर,डॉ.सुखदेव कारंडे,डॉ.प्रदीप केचे,डॉ.सुधीर आसबे,डॉ. अमोल परदेशी,डॉ.विनायक उत्पात आदीसह आयएमए संघटेनचे डॉक्टर व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.