सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी) आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या मित्रपक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क, सोलापूर येथे पार पडली.
यावेळी माजी आमदार आडम मास्तर आणि प्रकाश यलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून महाविकास आघाडीच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली. सर्व मित्रपक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीने लढविण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
याबैठकीस माजी आमदार आडम मास्तर,
प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी), चे अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर यु. एन. बेरिया, शंकर पाटील, भारत जाधव, अशोक निंबर्गी, एम.एच.शेख, जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, नलिनी कलबुर्गी यांच्यासह तीनही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांची एकत्रित विस्तृत बैठक होणार आहे.
प्राथमिक स्तरावर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची बैठक संपन्न झाली. यामध्ये आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे प्रमुख चंद्रकांत खैरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. आघाडीबाबत आणखीन एक विस्तृत बैठक होणार आहे. त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल.
– चेतन नरोटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार आघाडीबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे. लवकरच या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
– महेश गादेकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट



















