सांगोला – माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेच्या गेल्या ४७ वर्षांच्या वाटचालीची माहिती सांगणारे देवराई या पुस्तकाचे प्रकाशन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व संस्थेच्या कार्यावर आधारित दिंडी परिवर्तनाची या माहितीपटाचा लोकार्पण सोहळा वीणाताई गोखले यांच्या हस्ते पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे गीत संस्थेच्या सेविका उषा दहीवडकर यांनी सादर केले. प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष निलिमा कुलकर्णी यांनी संस्थेच्या ४७ वर्षांच्या कामाचा व त्यासाठी सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक, देणगीदार यांनी कशी मदत केली ते सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या खजिनदार डॉ.शालिनी कुलकर्णी यांनी करून दिला.
मनोगतात पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेल्या अनघा लवळेकर यांनी संस्थेच्या संपर्कात आलेल्या महिला, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना निर्भयतेची देणगी मिळाली आहे. म्हणूनच देवराई हे नाव अतिशय उचित आहे असे सांगितले. लेखिका राजमुग्धा फडके यांनी सांगोल्यासारख्या ग्रामीण भागात सामाजिक कामाची किती गरज आहे हे तीव्रतेने समजले. सांगोल्याचे काम जगापुढे यावे यासाठी पुस्तक लिहावे वाटले असे सांगितले. प्रमुख पाहुणे वीणाताई गोखले यांनी कितीही प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य फक्त महिलेकडेच असते. सांगोल्यात या संस्थेने अशा अनेक महिलांची आयुष्ये मार्गी लावली आहेत असे मत व्यक्त केले. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. चंद्रकांतदादा पाटील यांनी समाजपरिवर्तनासाठी संस्था गेली ४७ वर्षे करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. आणि संस्थेला कोणतीही मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माहितीपटात अपर्णा जोग व अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी निवेदन केले आहे.
आपल्या जादूच्या प्रयोगातून संस्थेच्या पहिल्या बालवाडीसाठी वर्गासाठी आर्थिक निधी मिळवून देणाऱ्या जादुगार विजय रघुवीर तसेच १९९० मध्ये महिला अन्याय निवारण समिती स्थापन करण्यासाठी सहकार्य करणारे सांगोला कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश कणबरकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार संस्था सचिव वसुंधरा कुलकर्णी यांनी मानले केले. अश्विनी कुलकर्णी यांनी गायलेल्या संस्था पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रामाणिकपणे आणि सद्हेतूने अनेक माणसे काम करत असतात आणि शहरातल्या लोकांना याची कल्पनाही नसते. पण हे मला सांगोल्यात जाऊन समजले. २०२५ सालातील माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली घटना म्हणजे माझं सांगोल्याला जाणं. सांगोल्यातील दीड दोन दिवसातील वास्तव्यामुळे मी माणूस म्हणून पूर्ण बदलले. संस्थेने मला त्यांच्या संस्था कुटुंबाचा भाग करून घेतला त्याबद्ल मी कृतज्ञ आहे. मी भरून पावले.
– अभिनेत्री मुग्धा गोडबोले