राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौक येथे भाषण करताना माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर टीका केली.
रे नगरचा निधी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी आम्ही हे नाही पहिलं, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आम्ही निधी दिला म्हणून आज रे नगर उभ राहिलं, असा टोला आडम मास्तर यांना फडणवीसांनी लगावला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना तीस हजार घरे आम्ही दिली आहे. हे जनतेला माहीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत मास्तरांना धारेवर धरले होते.
माजी आमदार नरसय्या आडम यांनी सुरुवातीला राजकीय भूमिका मांडत ताठर भूमिका घेतली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर राजकीय घडामोडी होत अखेर सीपीएमच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे ठरले. रे नगर, विडी घरकुल अशा वसाहती स्थापन करून कामगारांचे कैवारी नरसय्या आडम यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
सोलापूर शहराजवळ कामगारांसाठी तीस हजार घरकुल वसाहत निर्माण करण्यात आली आहे. ही वसाहत स्थापन करण्यासाठी आडम मास्तर आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी आंदोलने केली होती. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रे नगर वसाहतीला आर्थिक मदत केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रे नगरचं श्रेय घेण्यावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते.