अक्कलकोट – दिवाळी सुट्ट्यानिमित्त मागील तीन चार दिवसांपासून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शनासाठी देश विदेशातून भक्तगण मोट्या संख्येने दाखल झाल्याने शहरात सर्वत्र तुफान गर्दी झाला आहे. वाहनामुळे अक्कलकोट शहरातील सगळे रस्ते चक्काजाम झाले असून हाऊसफुल्ल झाले आहेत.
दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने भाविकांची शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवाळी पाडव्यापासून गर्दीला सुरूवात झाली असून शनिवार व रविवारमुळे या गर्दीने उच्चांक गाठला आहे. येणारा भाविक शहरी तसेच नोकरदार असल्याने चारचाकी वाहनातून येत आहे. परगावची चारचाकी वाहने, सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची चाळीस व पंचवीस क्षमतेची लहान मोठी वाहने, रिक्षा व स्थानिकांच्या दुचाकी यामुळे शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिकांना होत आहे.सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या चार दिवसांपासून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतुकीचे नियोजन कोलमडले असल्याने संताप व्यक्त होत आहे.दररोज शेकडो वाहनांनी शहरात एकाचवेळी प्रवेश केल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला असून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे. यामुळे मंगरुळे चौक, बस स्टैंड परिसर, हन्नूर रोड, मेन रोड आणि श्री मल्लिकार्जुन देवस्थान परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी कमी आणि पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने वाहनांची गर्दी वाढताच आहे. यामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले आहे
रात्रंदिवस भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असल्याने मंदिर समितीने २० तास मंदिर सुरू ठेवले आहे. भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मुख्य मंदिरापासून ते फत्तेसिह चौक, देशमुख गल्ली, भारत गल्लीपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या.सर्वत्र वाहनांचे पार्किंग झाले. मंदिर समिती, शिवपुरी, अन्नछत्र मंडळ, राजेराय मठ, खासगी लॉज, हॉटेल, घरगुती रूम सगळेच हाऊसफुल्ल झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातूनही लाखो भाविक दाखल झाले. मात्र सोयीसुविधांचा तुटवडा निर्माण झाला.वाहतूक कोंडी वर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अन्नछत्र मंडळ, हत्ती तलाव, भीमनगर, वीरक्त मठ, माणिक पेठ, एवन चौक, गाणगापूर रोडवरील एमआयडीसी ते सोलापूर मार्गावरील तालुका कृषी कार्यालयपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे पोलिसाना मोठया प्रमाणात कसरत करावी लागत आहे. वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा मेन रोडवर वनवे करण्याची मागणी होत आहे.
अक्कलकोटला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे त्रास होणे हे शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे. शहरात नगरपालिका कडून भविकाच्या वाहनाकडून कडून मोट्या प्रमाणात पार्किंग फी वशूल करण्यात येत आहे.त्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, वाहतूक मार्ग निश्चित करावा आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा भाविक व नागरिकां मधून व्यक्त होत आहे.




















