नांदेड / नायगांव – पवित्र राहेर तिर्थक्षेत्री श्री समर्थ सदगुरू बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान येथे सोमवार, दि.३ नोव्हेंबर रोजी ‘संत निवास भूमि पूजन, सामूहिक पारायण सांगता व आनंद दत्त महापूजा’ या धार्मिक उत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू धर्म जनजागृती २०२८ राहेर कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, सद्गुरू समर्थ नारायण गिरी गुरु बाळगीर महाराज यांच्या अथक परिश्रमातून सर्व संप्रदायातील संतांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सामूहिक पारायण सांगता व प्रवचनाने होईल. दुपारी ३.१५ वाजता भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत आनंद दत्त महापूजा पार पडेल. सकाळी काकडा आरतीने या पवित्र धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे.
या दिव्य कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे संत निवासाचे भूमिपूजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज (मठसंस्थान पिंपळगाव) भूषविणार असून, या वेळी खा. अजित गोपछडे, खा. रविंद्र चव्हाण, नायगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पवार, किनवटचे आमदार भीमराव केराम, बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर, म्हैसा मतदार संघाचे आमदार रामराव पवार तसेच माजी मंत्री भास्करराव पाटील खतगांवकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य सोहळ्याला जिल्हाभरातील सर्व संप्रदायाती ल संत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभिरबन महाराज (मठसंस्थान कोलंबी), श्री संत शामभारती महाराज (परमानंद आश्रम, केरोळी फाटा, माहूर), श्री संत नराश्याम महाराज (मठसंस्थान लघु आळंदी, येवती), श्री संत आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज (मठसंस्थान चोळाखा), श्री संत प्रज्ञाचक्षु भगवानगीर महाराज (मठसंस्थान बरड शेवाळा), प.पू. महंत कृष्णराज बाबा खामणेकर (चक्रधर स्वामी मठसंस्थान राहेर), श्री संत योगीराज बापू महाराज (मठसंस्थान उखळाई, हदगाव), श्री संत केशवगिरी गुरु मोहनगिरी महाराज (मठसंस्थान वासरी) व श्री संत सरोजगिरीमाता गुरु रूद्रगिरी महाराज (मठसंस्थान नायगांव) यांचा पवित्र सान्निध्य लाभणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन गुरुवर्य श्री. श्री. १००८ अष्ट कौशल्य सन्मानित सदगुरू समर्थ महंत नारायण गिरी गुरु बाळगीर महाराज (मठसंस्थान वडगुंफा, माहूर) व महंत रुद्रगिरी गुरु दयाळगिरी महाराज (मठसंस्थान किवळा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संत सान्निध्य, दत्त आराधना आणि भक्तीभावाने ओथंबलेल्या या सोहळ्याला सर्व भक्त, नागरिक व संतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
	    	 
                                




















 
                