आव्हाना – गावात धान पोर्णिमा हा सण मोठ्या भक्तिभावात, श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या पवित्र दिवशी गावातील प्रत्येक मंदिरात विधीपूर्वक धानपूजा करून देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यात आले.
या कार्यक्रमात ब्राह्मण धनंजय पाठक यांच्या पौरोहित्यात रुपालल पांढरे, पत्रकार सुरेश पांढरे व विठ्ठल सुरे यांच्या हस्ते विधीपूर्वक धानपूजा करण्यात आली. नवीन धान्य, तांदूळ व शेतीतील उत्पादनांची पूजाअर्चा करून शेती, पर्जन्य आणि अन्नदाता शेतकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
धान पोर्णिमा हा शेतीप्रधान संस्कृतीचा महत्वाचा सण असून “अन्न हे पूर्णब्रह्म” या भावनेतून हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त चांगले पीक येवो, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळो, गावात सुख-समृद्धी व शांती नांदो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या दिवशी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशात पूजाअर्चा केली, तर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून परंपरेचे जतन केले. धान पोर्णिमेसारखे सण ग्रामीण जीवन, शेती आणि निसर्ग यांचे अतूट नाते अधोरेखित करतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत, भक्तिभावात व उत्साहात पार पडला.






















