बीड – येथील श्रीमती योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ६१व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून महिला गटात धाराशिव विरुद्ध पुणे तर पुरुषांमध्ये पुणे विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. चारही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा भरणा असल्याने हे अंतिम सामने कमालीचे चुरशीचे होण्याची अपेक्षा आहे.
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने ठाण्याचा ३ गुण व ५० सेकंद राखून (३२–२९) निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही डावांत ड्रीम रनच्या जोरावर पुण्याने ४ गुण मिळवत आघाडी घेतली, तर ठाण्याला केवळ १ ड्रीम रन गुणावर समाधान मानावे लागले. पुण्याकडून श्वेता नवले (२.२४ मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (१.३० व २.०४ मि. संरक्षण व १० गुण), श्वेता वाघ (१.१४ मि. संरक्षण व ४ गुण), अपर्णा वर्धे (नाबाद १.३० व १.१६ मि. संरक्षण व २ गुण) यांनी निर्णायक खेळी करताना अंतिम फेरीची दारे उघडली तर पराभूत ठाण्याकडून रेश्मा राठोड (२.२० व १.३२ मि. संरक्षण व ४ गुण), प्रियांका भोपी (१.२० व १.०३ मि. संरक्षण) यांनी झुंजार खेळ करताना विजयाची पराकाष्टा केली, मात्र त्या अपयशी ठरल्या.
—-
महिला : धाराशिवने उडवला नाशिकचा धुव्वा
महिला गटातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात धाराशिवने नाशिकचा एक डाव व १० गुणांनी (२६–१६) धुव्वा उडवत रुबाबात अंतिम फेरी गाठली. धाराशिवकडून संध्या सुरवसे (३.१० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (२.३० मि. संरक्षण व ४ गुण), मैथिली पवार (२ मि. संरक्षण व २ गुण) यांनी संघाच्या विजयात धमाकेदार खेळी करत उल्लेखनीय मोठा विजय साजरा करत प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले. तर पराभूत नाशिककडून ज्योती मेढेने चांगली कामगिरी केली.
—-
पुरुष गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने सांगलीचा ३ मिनिटे ३७ सेकंद राखून २ गुणांनी (३६–३४) पराभव केला. उपनगरकडून अक्षय भांगरे (२.१० व १.१० मि. संरक्षण), अनिकेत चेंदवणेकर (१.३०, १.१० मि. संरक्षण व ८ गुण), प्रतीक देवरे (१० गुण), निहार दुबळे (१, १.०६ मि. संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत अंतिम फेरीचे दार ठोठावले तर पराभूत सांगलीकडून अक्षय मासाळ (१.०८ व १.३४ मि. संरक्षण व ४ गुण), अभिषेक केरीपाळे (१.१० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी चमकदार कामगिरी नोंदवली.
—–
पुरुष : पुण्याचा धाराशिववर थरारक विजय
पुरुष गटातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याने धाराशिववर १.१० मिनिटे राखून ४ गुणांनी (३७–३३) मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. चुरशीचा ठरलेला हा सामना प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढवत होते. पुण्याकडून शुभम थोरात (१.४५, २.३० मि. संरक्षण व ४ गुण), प्रतीक वाईकर (१.३०, १.३० व १.४० मि. संरक्षण व ८ गुण), सुयश गरगटे (१.००, १.३० मि. संरक्षण व २ गुण), रुद्र थोपटे (८ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करताना अंतिम फेरीत पोहचले तर पराभूत धाराशिवकडून विजय शिंदे (१.३०, १.०२ मि. संरक्षण व ४ गुण), श्री पेठे (१.२०, १.०२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंजार लढत दिली.
























