माहूर – गुरुवार, दिनांक ०४ डिसेंबर (पौर्णिमा) रोजी माहूर गडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे दत्तजयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. हातात निशाण, मुखी “दत्ता दिगंबरा… देवा दत्ता दत्ता”चा जयघोष — या गजराने माहूरगड येथील दत्तजन्मभूमीगडासह अवघी माहूरनगरी अक्षरशः दुमदुमून गेली. लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून भाविकांनी २ डिसेंबरपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला.
तत्पूर्वी काल बुधवारी (दि.०३) रोजी दत्तजयंतीनिमित्त गडावरील दत्तशिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मसोहळा भक्तिभावात संपन्न झाला. गडाचे परमपूज्य श्री श्री १००८ महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी २ वाजता श्री भगवान दत्तात्रेय प्रभु यांचा अभिषेक,समाधीपूजन करत सभामंडपात जन्मसोहळ्यास सुरुवात झाली. पोथीवाचन करण्यात आले. या दत्त जन्माचे अध्याय वाचन ब्रह्मवृंद ॠषिकेश जोशी यांनी केले.
यावेळी मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांच्यासह चिरंजीव भारती,हरिहर भारती,सुजान भारती, नितेश भारती,माधव गिरी, विलासराव जोशी,रवींद्र जोशी, विकास जोशी तसेच साधुसंत व उत्सव मंडळी उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
किर्तनकार पुसदकर महाराज यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दत्तगडावर भगवान दत्तात्रेय प्रभु यांच्या जयंतीनिमित्त गडावर उपस्थित लाखों भाविकांच्या सोयीसाठी श्री दत्तात्रेय शिखर संस्थानकडून दत्त जन्म सोहळा लाइव्ह पाहता यावा यासाठी जागोजागी भव्य एलईडी स्क्रीन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी संस्थानचे सचिव ठेंगे पाटील व व्यवस्थापक नाईक हे बारकाईने लक्ष ठेवून आपल्या कर्मचाऱ्यांसह परिश्रम घेत होते.
तर आज गुरुवारी श्री दत्तजयंतीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने मोफत महाप्रसादाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. माहूरच्या साईनाथ महाराजांच्या आनंद दत्त नाम मठ तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमात यंदाही पुरणपोळी व आम्ररस प्रसादाची परंपरा कायम ठेवत भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
एकूणच असेच म्हणावे लागेल कि,यावर्षीच्या दत्त जयंतीच्या यात्रोत्सवात श्री दत्तात्रेय प्रभु यांची जन्मभूमी ,तपोभूमी श्री अनुसया माता मंदिर, दत्त शिखर मंदिर, शहरातील महानुभाव पंथाचे मंदिर असलेले श्री दत्तात्रेय प्रभु यांचे निद्रास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे यासह श्री रेणुका देवी मंदिर आणि शेकडो मठ, आश्रम हे लाखों दत्तभक्तांच्या उपस्थितीने “देवा दत्ता दत्ता,देवा दत्ता दत्ता ! ” च्या नामस्मरणात तल्लीन होऊन” दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा! च्या दत्त गजराने दुमदुमून गेली आहे.
























