अहिल्यानगर : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करून तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अहिल्यानगर सायबर पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आली.
सावेडी येथील संदिप हरिभाऊ कुलथे यांना २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आणि व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आले. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला मुंबई सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंग, हवाला मनी आणि आयडेंटिटी थेफ्ट प्रकरणात आल्याचा खोटा दावा करून डिजिटल अटक करण्याची धमकी देत फिर्यादींकडून ₹८,८०,००० रुपये ऑनलाइन वळवून घेतले.
या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३/२०२५ भा.दं.सं. ३१८(४), ३३६(३), ३४०(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान सायबर पोलीस पथकाने तांत्रिक माहिती, बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तीन आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पुणे आणि नगर जिल्ह्यात छापे टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी विजय रंगनाथ चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर),
अभिजित अजिनाथ गिते (रा. दादेगाव, ता. आष्टी, सध्या नन्हे, पुणे),
अक्षय संजय तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा, सध्या हिंजवडी, पुणे) या
आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पो. उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे आणि अमोल आव्हाड यांनी केली आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने संशयास्पद लिंक, कॉल, OTP किंवा अनोळखी आर्थिक व्यवहारांवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.



















