सोलापूर : दिवाळीच्या पावन पर्वावर सोलापूर शहरातील आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीच्या वतीने सायंकाळी ६ वाजता ‘आदिला नदी दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाच्या माध्यमातून शहरवासीयांना आदिला नदीबद्दल आपलेपणाची जाणीव आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी जलपूजन करून नदीची आरती केली. नदीकाठी रांगोळ्यांनी सजवलेल्या घाटांवर शेकडो दिव्यांची सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशात आरतीचा गजर आणि मंत्रोच्चार सुरू होताच वातावरण भक्तिभावाने भारून गेले.
आयोध्येतील शरयू नदी आणि वाराणसीतील गंगेप्रमाणेच सोलापूरकरांना आदिला तीरावर देखील दिव्यांची तीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. अनेक नागरिकांनी या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दीपोत्सवामुळे नदीकिनारा केवळ प्रकाशमयच नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उर्जेने उजळून निघाला.
कृती समितीचे अध्यक्ष राजकिरण चव्हाण यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नदी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “नदी फक्त पाण्याचा प्रवाह नसून ती आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्तित्वाचा भाग आहे. दीपोत्सव म्हणजे निसर्गाशी एकात्म होण्याचा प्रयत्न आहे.”
या प्रसंगी डॉ. उत्कर्ष वैद्य, निलेश कांबळे, बालाजी रोडगे, सुहास नारायणकर, राजू बारगजे, शिवाजी सानप, संजय तिर्हेकर आदी मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. दीपोत्सवाने सोलापूरकरांना निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमातून “नदी वाचवा, संस्कृती जपा” असा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्यात आला.